जळगाव जामोद बसस्थानक परिसर असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात; विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी....


 जळगाव जामोद बसस्थानक परिसर असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात; विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी....

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या बसस्थानकाच्या मागील परिसर, मुख्य रस्ता आणि त्याला लागून असलेल्या दाट लोकवस्तीच्या गल्लींमध्ये काही असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उपद्रव सीमा ओलांडून गेला आहे. या भागातील हुल्लडबाजी, धिंगाणा आणि सार्वजनिक शांततेला सुरुंग लावणारे प्रकार नित्यक्रमाचे बनल्यामुळे येथील नागरिक, महिला आणि शिक्षणासाठी येणारे तरुण-तरुणी अत्यंत त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी समस्त परिसरातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.बसस्थानकाचा मागील परिसर हा प्रवाशांच्या वर्दळीचा असला तरी, याच पडछायेखाली काही निरुद्दिष्ट व अनुचित प्रवृत्तीचे तरुण आणि व्यक्ती दिवसभर विनाकारण रेंगाळत असतात.या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसमोर कोणतीही लाज बाळगल्याशिवाय मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे, आपापसात आपत्तीजनक भांडणे करणे आणि विनाकारण आरडाओरड करून दहशत निर्माण करणे हे या लोकांचे रोजचे सत्र बनले आहे. या भागात शिक्षणासाठी (ट्युशन क्लासेससाठी) परिसरातील आणि ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी नियमित येतात. तसेच महिलांचीही ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. या असामाजिक घटकांच्या देहबोलीमुळे आणि अशील वर्तनामुळे विद्यार्थिनींना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या छेडछाडसदृश्य व अरेरावीच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत आहे. सततच्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून, जळगाव जामोदसारख्या शांत शहरात कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.​बसस्थानक परिसर, मागील गल्ल्या आणि ट्युशन क्लासेसच्या आजूबाजूच्या मार्गांवर साध्या वेशातील तसेच गणवेशातील पोलिसांची नियमित व प्रभावी गस्त सुरू करण्यात यावी. गुन्हेगारी प्रवृत्तीची किंवा रिकामटेकडी बडबड करून दहशत माजविणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर बडगा उगारण्यात यावा. जळगाव जामोद शहरातील प्रत्येक महिला, भगिनी, तरुण विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही भय न बाळगता फिरता येईल, असे सुरक्षित, शांततापूर्ण आणि निकोप वातावरण निर्माण करून देण्यात यावे.​ह्या मागण्या निवेदनाद्वारे नागरिकांनी केल्या आहेत.दिवसागणिक बिकट होत चाललेल्या या समस्येची दखल जर प्रशासनाने वेळीच घेतली नाही, तर परिसरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन यादरम्यान तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दमही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आता स्थानिक पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यावर नेमकी काय कठोर पावले उचलते आणि जळगाव जामोदकरांना या त्रासातून कधी मुक्ती मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post