कामगिरीची दखल अन् जबाबदारीची नवी धुरा; सचिन बागुल यांची जळगाव जामोद पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती!अवैध धंद्यांवर धडक कारवाई, गुन्ह्यांची उकल अन् नागरिकांशी लोकाभिमुख संवादाचे बक्षीस;


 कामगिरीची दखल अन् जबाबदारीची नवी धुरा; सचिन बागुल यांची जळगाव जामोद पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती!अवैध धंद्यांवर धडक कारवाई, गुन्ह्यांची उकल अन् नागरिकांशी लोकाभिमुख संवादाचे बक्षीस;

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

कायद्याची अंमलबजावणी करताना कठोरपणा आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना संवेदनशीलता, या दोन्हींचा समतोल साधत आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करणारे सचिन बागुल आता जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे नियमित पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल घेत त्यांची जळगाव जामोद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.प्रभारी म्हणून कार्यरत असताना सचिन बागुल यांनी अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई, गुन्ह्यांची उकल, फरार आरोपींच्या अटका आणि जुगार व अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्याला प्राधान्य दिले. मंदिर चोरीसारख्या जुन्या गुन्ह्यांचा छडा लावत तपासाची दिशा योग्य पद्धतीने पुढे नेण्याची त्यांची कार्यशैली विशेष चर्चेत राहिली.त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध मोहिमा राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायद्याचा धाक आणि नागरिकांचा विश्वास या दोन्ही बाबींना बळ मिळाले.

पोलीस ठाणे’ नव्हे, तर नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र!

सचिन बागुल यांच्या कार्यपद्धतीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याला दिलेले प्राधान्य. लोकाभिमुख पोलिसिंगसोबतच गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेण्याची त्यांची शैली नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.याच कामाची दखल घेत त्यांची नियमित पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने शहरातील व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.जळगाव जामोद शहरासह संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे, ही मोठी जबाबदारी सचिन बागुल यांच्या खांद्यावर आली आहे.

प्रभारी म्हणून केलेल्या कामगिरीनंतर मिळालेली ही नियमित नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास मानला जात असून, ‘बागुल यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद पोलिसिंगला आणखी धार येणार का?’ याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post