जळगाव जामोद(प्रतिनिधी):
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप करत येनगाव शिवारातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक एम. निकम यांच्याकडील येनगाव शिवाराचा कार्यभार तातडीने काढून घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार जळगाव जामोद तथा कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कृषी सहाय्यक एम. निकम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या कांदा, हरभरा तसेच इतर पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्येही कथित अनियमितता झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.खरे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत कृषी अधिकारी जाधव यांच्याकडे यापूर्वीच तीन ते चार वेळा तक्रारी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.एका व्यक्तीच्या कथित चुकीच्या कारभारामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहत असल्याने गावात नाराजी निर्माण झाली आहे.तसेच पंचनाम्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन गावातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडत असल्याचेही शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे एम. निकम यांच्याकडील येनगाव कृषी सहाय्यक पदाचा कार्यभार काढून घेण्यात यावा आणि सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यांची जबाबदारी अन्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे सोपवावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नुकसानग्रस्तांचे पंचनामे निष्पक्ष, पारदर्शक आणि प्रत्यक्ष शेत पाहणी करून करण्यात यावेत, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.निवेदन देताना दत्ताभाऊ पाटील, आशिष वायझोडे, रामराव वायझोडे, वासुदेव वायझोडे, विठ्ठल मानकर, संतोष वडनेरकर, विलास कुकडे, भीमराव वाघ, संतोष भारसाकळे, देवमन दाभाडे, अरुण वायझोडे, मंदाबाई मारोडे, डिगांबर वायझोडे, राजू भारसाकळे, मरी दाभाडे, जगन्नाथ वायझोडे, बळीराम मानकर, समाधान मानकर, भारत इंगळे, हरिदास हेलोडे, प्रकाश सरदार यांच्यासह येनगाव शिवारातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
