बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची प्रथम बैठक ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी भवन, बुलढाणा येथे उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासह पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, “मिळालेल्या पदाच्या माध्यमातून नियोजनपूर्वक पक्ष संघटन मजबूत करा. सर्वसामान्य व उपेक्षित घटकांसाठी काम करून जनसामान्यांचा विश्वास संपन्न करा,” असे आवाहन केले.
तर जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे निर्देश दिले. आघाडीमध्ये पक्षाला सन्मानजनक स्थान मिळाले तर ठीक; मात्र गरज पडल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला. पक्ष निरीक्षक पंकज नाना बोराडे, प्रा. विश्वनाथ कांबळे तसेच माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार यांनीही संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले.दरम्यान, विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच राम राठोड यांची प्रांताध्यक्ष, शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीला माजी आमदार नानाभाऊ कोकरे, प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, बी.टी. जाधव, प्रदेश सचिव अफ्ताफ खान, डॉ. रिजवान खान यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता अजीम नवाज राही यांनी केले.
