व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल! राधेश्याम बंगाळे पाटील यांना ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’शेगाव येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव; ६२८ प्रस्तावांतून १२५ मान्यवरांची निवड...


 व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल! राधेश्याम बंगाळे पाटील यांना ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’शेगाव येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव; ६२८ प्रस्तावांतून १२५ मान्यवरांची निवड...

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):

व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणारे दरेगाव येथील राधेश्याम बंगाळे पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त शेगाव येथे १ ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती तसेच दैनिक लोक युवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’ आयोजित करण्यात आला होता. संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालय येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या पुरस्कारासाठी राज्यभरातून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ६२८ प्रस्तावांमधून निवड करून विविध क्षेत्रातील १२५ मान्यवरांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यामध्ये राधेश्याम बंगाळे पाटील यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी, भाजप शहराध्यक्ष चंद्रकांत घोराडे आणि उद्योजक बाळासाहेब दामोदर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, कला, वैद्यकीय क्षेत्र, वकिली, उद्योग, अभिनय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला.व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी राधेश्याम बंगाळे पाटील यांनी केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक योगदानाची पावती मानला जात आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल दरेगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केसकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.

Previous Post Next Post