बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतून सुरू झालेला रुग्णसेवेचा प्रवास आज मराठवाड्याच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर गौरविला गेला. त्वचारोग उपचार क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी दिलेल्या सेवांची दखल घेत डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे आणि मंत्री मा. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात डॉ. गोंधणे यांनी हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारला.बुलढाणा जिल्ह्याशी नाळ जपत डॉ. गोंधणे यांनी मराठवाड्यातही त्वचारोग रुग्णसेवेचा विस्तार केला. शहरांसह ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविण्याच्या ध्येयातून त्यांनी सातत्याने केलेल्या कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. गोंधणे यांनी, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचा, हितचिंतकांचा तसेच माझ्या संपूर्ण प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचा आहे. सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञ आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्हाभरातून डॉ. गोंधणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
