अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड येथे संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.पुण्यतिथीनिमित्त सकाळी वैकुंठधाम स्मशानभूमी, कर्लावेश येथे वृक्षारोपण करण्यात आले,संत सावता माळी महाराजांनी समाजाला दिलेल्या मानवसेवा, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाच्या विचारांना अभिवादन म्हणून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
सायंकाळी संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व हार अर्पण करून सावता महाराजांच्या अभंगांचे गायन, भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. भक्तिमय अभंग आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या कार्यक्रमातून ‘संत सावता महाराजांचे विचार आचरणात आणूया आणि समाजसेवेसोबत पर्यावरणाचेही रक्षण करूया’ असा संदेश सुद्धा देण्यात आला.कार्यक्रमास समाजबांधव, भाविक, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत यंदाची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
