बंधारा दुरुस्तीअभावी शेती उद्ध्वस्त; अखेर शेतकऱ्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू!“न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही” — येनगावच्या शेतकऱ्याचा निर्धार;


 बंधारा दुरुस्तीअभावी शेती उद्ध्वस्त; अखेर शेतकऱ्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू!“न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही” — येनगावच्या शेतकऱ्याचा निर्धार; 

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव शिवारातील बंधारा दुरुस्तीअभावी अतिवृष्टीचे पाणी शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करत येनगाव येथील शेतकरी देवमन मरी दाभाडे यांनी अखेर आज दि. १४ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

येनगाव शिवारातील गट क्रमांक ६८ हा नदीकाठालगत असून या ठिकाणी असलेला बंधारा फुटल्यामुळे अतिवृष्टीचे तसेच नदीचे पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती वेळेत करण्यात यावी, यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.बंधारा फुटल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे केळी व संत्रा बागांचे, ठिबक सिंचन संच, पाइपलाइन, मोटारपंप तसेच दोन विहिरींच्या पाणी व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचे दाभाडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. मोटारपंप गाळामध्ये फसल्याने शेतीचे जवळपास १०० टक्के नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.यापूर्वीच बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने अखेर अतिवृष्टीच्या पाण्याचा फटका आपल्या शेतीला बसला आणि उभे पीक व शेतीसाठी केलेली गुंतवणूक पाण्यात गेली, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे.शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दाभाडे कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, कुटुंबातील आजारपणाचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या असताना शेतीच उद्ध्वस्त झाल्याने पुढील संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने पत्नीच्या नावावरील सोने गहाण ठेवण्याची वेळ आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचा तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्याला न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी दाभाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.दरम्यान, शेतकऱ्याच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले असून, या प्रकरणी प्रशासन कोणती तातडीची कार्यवाही करते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे येनगावसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post