जळगाव जामोद(प्रतिनिधी):
३० व ३१ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील नदी-नाल्यांना आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हजारो एकर शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, अनेकांची गुरेढोरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन पुरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.जळगाव जामोद शहरातील महादेव वाघोदे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची गंभीर दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.पूरग्रस्त शेतकरी,शेतमजूर आणि नागरिकांच्या नुकसानीचे निष्पक्ष व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत.कोणताही नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, तसेच शेतीपिके, घरे, गुरेढोरे आणि संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन तातडीने शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, सुनील बोदडे, ॲड. संदिप उगले, रतन नाईक, उपसभापती प्रशांत अवसरमोल, मंगल डोंगरदिवे, विजयकुमार तायडे, नाना डोंगरदिवे, गुलाबराव आठवले, अताउल्ला खान, आजम कुरेशी, अन्वर तडवी, जगदीश हातेकर, सुनिता हेलोडे, रोशन तायडे, ज्ञानेश्वर कोकाटे, आनंद गवई, संतोष तिजारे, लोकपाल भगत, श्रीराम भिडे, सुपा बांगर, रविंद्र नाईक, रामभाऊ तायडे, रविंद्र तायडे, वैभव वानखडे, संतोष भारसाकळे, सोहेल खान, प्रमोद कोकाटे, बाबुराव तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर तसेच पूरग्रस्त महिला-पुरुष उपस्थित होते.
