जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे घराच्या दरवाज्यासमोर संशयास्पद साहित्य आढळून आल्याने जादूटोण्याचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडेगाव येथील लालशहा युनुस शहा (वय ५०, व्यवसाय शेती) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाज्यासमोर पानावर कुंकू, हळद, गुलाल, बिबा, लिंबू तसेच त्यामध्ये ७ ते ८ लोखंडी सुया ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, हे साहित्य फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर जादूटोणा करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.याप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी महादेव लक्ष्मण पांडे (वय अंदाजे ५० वर्षे, रा. झाडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी कायमी अप. क्र. ४९६/२०२६ नुसार कलम ३, महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.४३ वाजता दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अतुल मोहाळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास सुरू आहे. घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्याची नोंदही पोलिसांच्या माहितीत आहे.दरम्यान, घराच्या प्रवेशद्वारासमोर अशा प्रकारचे साहित्य आढळल्याने झाडेगाव परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासातून नेमका प्रकार काय होता आणि सदर साहित्य कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवले, हे स्पष्ट होणार आहे.
