जळगाव जामोद(प्रतिनिधी);
सुलज ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात गावातील युवकांनी एकत्र येत तीव्र एल्गार पुकारला. ग्रामसेवकाच्या कार्यपद्धतीची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी युवकांनी पंचायत समिती, जळगाव जामोद येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.निवेदनात ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची विविध शासकीय कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नसून, कार्यालयीन कामकाजात दिरंगाई होत असल्याने नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.युवकांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे युवकांनी सांगितले.
