हिवरखेड परिसरात १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान उत्स्फूर्तपणे राबविले...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
समाजातील तरुणाईला व्यसनांपासून परावृत्त करून नशामुक्त आणि निरोगी समाजनिर्मिती करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि भारत सरकार यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत (MOU) ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ देशभर राबविण्यात आले.ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका आदरणीय ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणीजी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत हे अभियान घेण्यात आले.
हिवरखेड येथील ब्रह्माकुमारी केंद्र ‘ओम शांती भवन’ च्या संचालिका ब्रह्माकुमारी वैशाली दीदी व त्यांच्या टीमने परिसरातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली. सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड, Saint Paul's Academy हिवरखेड, राजीव गांधी विद्यालय तळेगाव बाजार, सावित्रीबाई फुले कन्या शाळा बेलखेड, नूतन विद्यालय बेलखेड आदी शाळांमध्ये हे अभियान उत्स्फूर्तपणे व यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती विषयावरील नाटिकेचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तसेच ब्रह्माकुमारी वैशाली दीदी यांनी शाळेतील शिक्षकांना ‘ईश्वरीय राखी’ बांधून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प दृढ केला.हे अभियान यशस्वी करण्यासाठी ब्रह्माकुमारी सुलभा दीदी, बी.के. शामभाई खाडे, बी.के. वंदनाताई खारोडे,चंद्रप्रकाशजी भोपळे, नटवरलालजी तापडिया , विजुभाऊ पवार, प्रशांतभाई ढोकणे, गणेशभाऊ बुर्घाटे, कुमारी खुशी, अंकित नांदोकार, प्रणेश नाठे, जतिन अढिया व कौशिक पवार यांनी परिश्रम घेतले.या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्याची जाणीव निर्माण होऊन ‘नशामुक्त युवा—नशामुक्त समाज’ या संकल्पनेला बळ मिळाले.


