जळगाव जामोद (प्रतिनिधी);
पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक व नाविन्यपूर्ण शेतीची कास धरल्यास शेतीतून निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा प्रत्यय जामोद येथील प्रगतशील शेतकरी संतोष तेलंग्रे यांच्या ड्रॅगन फ्रुटच्या यशस्वी शेती प्रयोगातून येत आहे. मेहनत, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत त्यांनी आपल्या शेतात उभारलेली ड्रॅगन फ्रुटची बाग सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.या नाविन्यपूर्ण शेती प्रयोगाची पाहणी करण्यासाठी जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे साहेब यांनी ड्रॅगन फ्रुटच्या बागेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बागेची प्रत्यक्ष पाहणी करत लागवड पद्धती,पिकाची वाढ, पाणी व्यवस्थापन, देखभाल तसेच उत्पादन व बाजारपेठेच्या संधींबाबत संतोषभाऊ तेलंग्रे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.ड्रॅगन फ्रुटसारख्या आधुनिक पिकाकडे वळून यशस्वी प्रयोग केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी संतोष तेलंग्रे यांच्या मेहनतीचे, नियोजनाचे आणि दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले.पारंपरिक पिकांसोबतच बदलत्या काळानुसार बाजारपेठेत मागणी असलेल्या पर्यायी पिकांचा विचार शेतकऱ्यांनी करणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी वैभव कृषी केंद्राचे मालक अमोल हिस्सल यांचे शेतकऱ्यांना मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. लागवडीपासून पिकाच्या व्यवस्थापनापर्यंत आवश्यक मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य मिळाल्यामुळे ही बाग चांगल्या पद्धतीने विकसित झाल्याचे सांगण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन हागे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी संतोष तेलंग्रे यांच्या प्रयोगाचे कौतुक करताना, कमी पाण्यात तुलनेने चांगल्या उत्पन्नाची क्षमता असलेल्या ड्रॅगन फ्रुटसारख्या पिकांकडे शेतकऱ्यांनी आधुनिक पर्याय म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली.“शेतीत बदल स्वीकारला, तर उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात,” हा संदेश संतोष तेलंग्रे यांच्या प्रयोगातून पुढे येत असून, जामोद परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी त्यांची ड्रॅगन फ्रुट शेती निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारी आहे.या भेटीमुळे आधुनिक शेती, नवीन पिके आणि कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रशासनाकडूनही प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
