जळगाव जामोद(प्रतिनिधी);
जळगाव जामोद तालुक्यात नाफेडमार्फत झालेल्या ज्वारी खरेदीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. तालुक्यात तब्बल ५८ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी झाल्याचा दावा करण्यात आल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारी नेमकी आली कुठून, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांनी या संपूर्ण खरेदी प्रक्रियेवर गंभीर आरोप करत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे लेखी तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.नाफेडच्या माध्यमातून भरडधान्य खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, जळगाव जामोद तालुक्यात नाफेडच्या माध्यमातून कुलभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., वडगाव पाटण; कुरणगाड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., कुरणगाड बु.; आणि रामदेव कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., जळगाव जामोद यांच्यामार्फत ज्वारी खरेदी करण्यात आली.मात्र तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये ज्वारीचे क्षेत्र तुलनेने कमी असताना ५८ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी झाल्याचा दावा समोर आल्याने खरेदीच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘स्थानिक शेतकऱ्यांचीच ज्वारी होती का?’एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांनीच उत्पादित केली होती का? ज्वारी कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली? खरेदी झालेला माल नेमका कुठून आला? याची सखोल चौकशी करण्याची मागणी गजानन वाघ यांनी केली आहे.तक्रारीत बाहेरील राज्यातून ज्वारी आणून नाफेडच्या योजनेअंतर्गत विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, पिकपेरा, उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्ष खरेदीच्या नोंदी तपासल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा करण्यात आला आहे.तर शेतकरी नोंदणी प्रक्रियेत एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या नोंदींची तांत्रिक तसेच प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या कथित प्रकारामुळे पात्र आणि स्थानिक शेतकऱ्यांना नाफेडच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत देयके रोखण्याची मागणी...
संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यासाठी तातडीने समिती गठित करावी, प्रत्येक शेतकऱ्याने विकलेल्या ज्वारीचे प्रमाण, सातबारा, पिकपेरा, उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्ष खरेदीची नोंद यांचा ताळमेळ तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित देयके रोखण्यात यावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, १५ दिवसांच्या आत चौकशी न झाल्यास शिवसेना उबाठाच्या वतीने संबंधित कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी दिला आहे.दरम्यान, ५८ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचा नेमका हिशोब काय? ज्वारी कोणाची आणि कुठून आली? या प्रश्नांवर आता चौकशीचे काय निष्कर्ष समोर येतात, याकडे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित यंत्रणेकडून या आरोपांबाबत काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
