दारू-जुगारावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; गुटख्याच्या कारवाईत तब्बल २२.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त!जानेवारीपासून जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २९ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, ६० मिसिंग चा शोध...


 दारू-जुगारावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; गुटख्याच्या कारवाईत तब्बल २२.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त!जानेवारीपासून जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २९ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, ६० मिसिंग चा शोध...

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत धडाकेबाज कारवायांची मालिका राबविली आहे. अवैध दारू, जुगार, गांजा, प्रतिबंधित गुटखा तसेच चोरीच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत जवळपास २९ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे प्रतिबंधित गुटख्याच्या कारवाईत तब्बल २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी सातत्याने कारवाया केल्या. जानेवारीपासून आतापर्यंत दारूच्या तब्बल १३६ केसेस दाखल करण्यात आल्या असून, या कारवायांमध्ये २ लाख ९० हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अवैध जुगारावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असुन आतापर्यंत जुगाराच्या ६२ केसेस करण्यात आल्या असून, या कारवायांमधून १ लाख ९४ हजार ५१० रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा चोरीछुप्या पद्धतीने जुगार चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.तसेच अंमली पदार्थांच्या विरोधातही जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली आहे. गांजासंदर्भात एक कारवाई करत तब्बल २ लाख ५० हजार ५१५ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या एका कारवाईमध्ये २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीतही जळगाव जामोद पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून, त्यामध्ये दोन चेन स्नॅचिंग, तीन चोरी आणि एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. गुन्हेगारांचा माग काढून प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारीपासून आतापर्यंत ९३ मिसिंग तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ६० मिसिंग व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित ३३ मिसिंग व्यक्तींचा शोध सुरू आहे. विविध पातळ्यांवर तपास करून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे.

याबाबत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांनी सांगितले की, “पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. अवैध दारू, जुगार, गांजा, प्रतिबंधित गुटखा तसेच इतर कोणत्याही बेकायदेशीर धंद्यांना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांनीही अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची गोपनीयता राखली जाईल. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील.”

Previous Post Next Post