अकोटमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस उत्साहात व शांततेत संपन्न..हजरत मौलाना आमिर रज़ा साहेब यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’च्या जयघोषाने अकोट शहर दणाणले...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात पार पडला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रज़ा साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या ऐतिहासिक मिरवणुकीने शहरात धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संदेश दिला. संपूर्ण मार्गावर ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या गगनभेदी जयघोषाने अकोट शहर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले.या भव्य मिरवणुकीत बालकांपासून ते युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. मिरवणुकीत साकारण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या गुंबदाची देखणी प्रतिकृती उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. फुलांनी आकर्षक सजविण्यात आलेल्या बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रज़ा साहेब विराजमान झाले होते. मार्गावरील विविध ठिकाणी नागरिकांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून व स्वागत करून आदर व्यक्त केला.अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले होते.

या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहाय्यक सय्यद अहमद यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.शहरातील शौकत अली चौक येथून प्रारंभ झालेला हा जुलूस निर्धारित मार्गाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत पुन्हा शौकत अली चौक येथे शांततेत व नियोजित वेळेत संपन्न झाला.जुलूस शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अकोट पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जुलूस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. निखिल पाटील – उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), अकोट,किशोर झुंगरे – पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन श्रीधर गुट्टे – पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे – प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), हिंमत दांडी बिट जमादार यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रज़ा साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल जुलूस कमिटीने पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले.