शिक्षक की प्रॉपर्टी डीलर? नांदुरा येथील शिक्षकाविरोधात तक्रार; निलंबनाची मागणी...सरकारी नोकरीसोबत प्रॉपर्टी डीलिंगचा आरोप; शिक्षण विभागाकडे चौकशीसाठी धाव...


 शिक्षक की प्रॉपर्टी डीलर? नांदुरा येथील शिक्षकाविरोधात तक्रार; निलंबनाची मागणी...सरकारी नोकरीसोबत प्रॉपर्टी डीलिंगचा आरोप; शिक्षण विभागाकडे चौकशीसाठी धाव...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

नांदुरा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळा व हायस्कूल, पेठ मोहल्ला येथील एका शिक्षकाविरोधात गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करून दोष आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शेख मुश्ताक शेख ईसा उर्फ भाईजान यांनी बुलढाणा येथील शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार अर्ज साद केला आहे.तक्रारीनुसार, संबंधित शिक्षक अब्दुल खालिक अब्दुल खलील उर्फ बाबू जमदार हे नांदुरा येथील संबंधित संस्थेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, ते गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकाची नोकरी सांभाळतानाच प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षक मागील १० ते १२ वर्षांपासून प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत असून, या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता व्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी शिक्षकाने स्वतःच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, सरकारी सेवेत असताना प्रॉपर्टी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचा दावा करत मालमत्ता व्यवहार, उत्पन्नाचे स्रोत आणि संबंधित जमिनींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेत इतर शिक्षकांवर दादागिरी केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची कडक चौकशी करून संबंधित आरोपांची सत्यता तपासावी, दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.दरम्यान, तक्रारीच्या प्रती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, संबंधित संस्था अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण उपसंचालक अमरावती, गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.या तक्रारीतील आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार असून, संबंधित शिक्षकांची बाजू अथवा शिक्षण विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post