जळगाव जामोद, प्रतिनिधी :
जळगाव जामोद शहरातील विविध ठिकाणी टपरी व हातगाडीच्या माध्यमातून लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. यासंदर्भात लघु व्यावसायिक टपरीधारकांनी मुख्याधिकारी, नगर परिषद जळगाव जामोद यांना २० ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, संबंधित व्यावसायिक अनेक वर्षांपासून नगर परिषद क्षेत्रातील जागांवर टपरी अथवा हातगाडी उभी करून व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, नगर परिषदेकडून वेळोवेळी टपरी व हातगाड्या हटविण्याची कारवाई केली जात असल्याने व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.जळगाव जामोद शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत नसल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत लघु व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभा करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई झाल्यास त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यातील अनेक व्यावसायिकांनी शासकीय योजनांमधून कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार कारवाई झाल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण होत असून आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यामुळे मानसिक तणावही निर्माण होत असल्याची गंभीर बाब निवेदनातून मांडण्यात आली आहे.
नगर परिषदेकडून टपरीधारकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाल्यास ती जागा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असणे आवश्यक आहे. केवळ पर्यायी जागा देऊन व्यवसायाची व्यवहार्यता नष्ट होऊ नये, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू आहे, त्याच ठिकाणी नियमानुसार व्यवसाय करण्याची परवानगी देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच भविष्यात शासन अथवा नगर परिषदेकडून त्या परिसरात बांधकाम, सौंदर्यीकरण किंवा इतर विकासकामे करण्यात येणार असल्यास टपरीधारकांना अचानक हटवू नये. त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन आमदार डॉ. संजय कुटे, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तसेच ठाणेदार यांनाही माहिती व योग्य कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहे. लघु व्यावसायिकांना त्यांच्या नियोजित जागेवर कोणताही अडथळा न आणता व्यवसाय करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षानिवेदन देतेवेळी योगेश वाघ, गोपाल कळसकार, गजानन शेगोकार, प्रकाश वंडाळे, सय्यद समीर, अनिल मुळतकर, गणेश आमले, प्रसाद गोंड, आकाश झापर्डे,नासीर खान, सलमान खान, सचिन इंगळे, विजय राऊत,व इतर स्वाक्षरी करणाऱ्या टपरीधारकांनी व्यक्त केली आहे.
