क्रिप्टोकरन्सीच्या ‘जादा परताव्या’च्या आमिषाला भुलले; जळगाव जामोदच्या ६१ वर्षीय व्यक्तीला तब्बल ₹१०.७१ लाखांचा गंडा! फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअॅपवरून संपर्क; अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल...


 क्रिप्टोकरन्सीच्या ‘जादा परताव्या’च्या आमिषाला भुलले; जळगाव जामोदच्या ६१ वर्षीय व्यक्तीला तब्बल ₹१०.७१ लाखांचा गंडा!

फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअॅपवरून संपर्क; अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणुकीच्या जाहिराती आणि जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्यास लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो, याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात समोर आला आहे. क्रिप्टोकरन्सी (USDT) मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ६१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ₹१० लाख ७१ हजार ४५३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे कायम अप.क्र. ४९७/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C), 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 316(2), 318(2), 318(4) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव, ता. जळगाव जामोद येथील राजेशकुमार भीकमचंद केला (वय ६१) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दि. २६ जानेवारी २०२६ रोजी फेसबुकवर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याची जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली.जाहिरातीतील लिंकवर क्लिक केल्यानंतर एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला.समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव ‘सुनील कुमार’ असे सांगून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तसेच गुंतवणुकीत नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी २७ जानेवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून आरोपीच्या सांगण्यानुसार विविध व्यवहारांद्वारे तब्बल ₹१०,७१,४५३.२० रक्कम हस्तांतरित केली.मात्र मोठ्या परताव्याची अपेक्षा असताना ना नफा मिळाला ना गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी ४ मार्च २०२६ रोजी NCCRP पोर्टलवर ACK No. 31903260048552 द्वारे तक्रार नोंदवली.सदर गुन्हा सुरुवातीला सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे नोंदविण्यात आला होता.पुढील तपासात घटनास्थळ पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हस्तांतरित करून कायम अप.क्र. ४९७/२०२६ म्हणून नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

_____________________________

सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक गुंतवणूक जाहिराती, जादा परताव्याची हमी किंवा अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा NCCRP पोर्टलवर तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांनी केले आहे..

Previous Post Next Post