लाकूड वाहतुकीच्या ‘ट्रान्झिट पास’साठी २ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; वन विभागाच्या लोकसेवकाविरुद्ध गुन्हा! बुलढाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई;


 लाकूड वाहतुकीच्या ‘ट्रान्झिट पास’साठी २ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; वन विभागाच्या लोकसेवकाविरुद्ध गुन्हा!

बुलढाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; 

अनिल भगत/बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);

लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या Transit Passच्या कामासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागातील लोकसेवकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी अनिल जगदेव वाघ (वय ५३), वनसर्वेक्षक, वर्ग-३, उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा, रा. अंबिकानगर, सागवान, ता. जि. बुलढाणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे सुतारकामाचा व्यवसाय करतात. त्यांनी दोन शेतकऱ्यांकडून सागवान झाडे विकत घेऊन वन विभागाच्या परवानगीने तोडलेल्या लाकडाची वाहतूक करण्यासाठी Transit Pass मिळावा, यासाठी संबंधित शेतकऱ्यांमार्फत वन विभाग, जळगाव जामोद येथे अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या बुलढाणा कार्यालयात पाठविण्यात आला होता.या कामासंदर्भात तक्रारदारांनी बुलढाणा येथील उपवनसंरक्षक कार्यालयातील लोकसेवक अनिल जगदेव वाघ यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी लाकूड वाहतूक परवानगीचे (Transit Pass) काम करून देण्यासाठी लोकसेवक गाडवे यांच्या नावाने स्वतःकरिता २ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.त्यानंतर तक्रारदाराने ९ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी ९ जुलै व १६ जुलै २०२६ रोजी करण्यात आली.पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.१२ ते ५.२५ वाजेदरम्यान उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा परिसरात सापळा कारवाई आयोजित करण्यात आली.मात्र, सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराबाबत संशय आल्याने लोकसेवक अनिल वाघ यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. नं. ९१८/२०२६, कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेस नोटनुसार आरोपीस १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.१९ वाजता अटक करण्यात आली.या कारवाईत भागोजी चोरमले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले.पथकात पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहेकॉ. प्रविण बैरागी, अमोल झिने, दिपक जाधव, जगदीश पवार, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रजित व्यवहारे, रतन गिरी, प्रफुल आमले, चापोहेकॉ. नितिन शेटे आणि चापोको. अर्शद शेख यांचा समावेश होता.या कारवाईसाठी  बापू बांगर, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती तसेच सुनिल किनंगे, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post