जामोदची महाराष्ट्र ग्रामीण बँक हलवण्याचा डाव? शेतकऱ्यांचा संताप; “आर्थिक व्यवहार याच शाखेत ठेवा, अन्यथा आंदोलन!” २५ हजार लोकसंख्येच्या गावावर अन्यायाचा आरोप; एसबीआय कृषी शाखेशी जोडणीला शेतकरी-नागरिकांचा तीव्र विरोध...


 जामोदची महाराष्ट्र ग्रामीण बँक हलवण्याचा डाव? शेतकऱ्यांचा संताप; “आर्थिक व्यवहार याच शाखेत ठेवा, अन्यथा आंदोलन!”

२५ हजार लोकसंख्येच्या गावावर अन्यायाचा आरोप; एसबीआय कृषी शाखेशी जोडणीला शेतकरी-नागरिकांचा तीव्र विरोध...

जळगाव जामोद (प्रतिनिधी) : 

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, पेन्शनधारक व विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जामोद कायम ठेवावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत जामोदच्या लोकनियुक्त सरपंचांसह शेतकरी व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, एलडीएम, एडीआर व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.जामोद हे अंदाजे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, परिसरातील अनेक छोटी-मोठी गावे या गावाशी जोडलेली आहेत. मागील सुमारे ३५ वर्षांपासून जामोद व परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, श्रावणबाळ पेन्शनधारक, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित नागरिक महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी आर्थिक व्यवहार करत आहेत.जामोद परिसरातील प्रमुख व्यवसाय शेती असून, शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, व्यवसाय कर्ज, बचत गटांचे व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही सोयीची ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरातील आदिवासी समाजाचीही मोठी संख्या असून, बँक शाखा गावातच कायम राहणे नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, खेल शिवापूर जामोद, खेल लोण जामोद, खेल माळी जामोद व खेल पारस्कर जामोद येथील शेती कर्जधारक व आर्थिक व्यवहार जळगाव जामोद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखेशी जोडण्यात आल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.जामोद गावातील शेतकरी, शेतमजूर व इतर कर्जदारांना गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेशी जोडण्याऐवजी सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील जळगाव जामोद येथील एसबीआय कृषी शाखेशी जोडणे गैरसोयीचे असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील भेडवड खुर्द व इतर गावांना जामोद शाखेशी जोडले जात असल्याची बाबही निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

“जामोद गावातील सर्व आर्थिक व्यवहार महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जामोदशीच कायम ठेवण्यात यावेत. शेतकरी व नागरिकांची गैरसोय होईल अशा पद्धतीने शाखा बदल अथवा जोडणी करू नये,” अशी मागणी करण्यात आली आहे.मागणीची दखल न घेतल्यास सर्व गावकरी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशाराही सरपंच व शेतकरी-नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.यावेळी सरपंच गंगुबाई दामधर, समाधान दामधर, रमेश धुरडे, भास्कर हिस्सल, गणेश धर्म, गजानन ढगे, अमोल भगत, सुभाष ढगे, प्रतिक ढगे, पांडुरंग राऊत यांच्यासह जामोद येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post