जळगाव जामोद(प्रतिनिधी);
बुलढाणा जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ निवारणासाठी तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने बुलढाणा जिल्हाधिकारी देवरे यांनी जळगाव जामोद उपविभागातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आगामी काळातील संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी विभागनिहाय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.या बैठकीला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील, संग्रामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील,गटविकास अधिकारी ऐश्वर्या कोरे,संग्रामपूर गटविकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, जलसंपदा विभागाचे अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांतील गावनिहाय पाणी उपलब्धता, संभाव्य टंचाईग्रस्त भाग, उपलब्ध जलस्रोत तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत आवश्यक माहिती घेण्यात आली.पुढील वर्षभर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये, यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन, आवश्यक उपाययोजना आणि संभाव्य टंचाईच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था याबाबत संबंधित विभागांनी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता पशुधनावरही होण्याची शक्यता असल्याने तालुकानिहाय जनावरांची संख्या, उपलब्ध चारा, भविष्यातील चाराटंचाईची शक्यता आणि आवश्यक चारा नियोजन यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.पशुधनासाठी आवश्यक पाणी व चारा उपलब्ध राहील, यासाठी संबंधित विभागांनी परिस्थितीचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दुष्काळी परिस्थितीचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता पिक पाहणी, पिकांची सद्यस्थिती, पर्जन्यमानातील खंड आणि संभाव्य पीक नुकसानीची माहिती अचूकपणे संकलित करण्यावर भर देण्यात आला. कृषी विभागाने शेतपिकांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ एका विभागावर अवलंबून न राहता महसूल, पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी, जलसंपदा, पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.दरम्यान, आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाणी, चारा, पशुधन आणि शेती या चारही आघाड्यांवर प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
