दारूच्या नशेत बेभान वाहनचालकाचा कहर! दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण गंभीर जखमी...


 दारूच्या नशेत बेभान वाहनचालकाचा कहर! दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण गंभीर जखमी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

धानोरा महासिद्ध येथून जळगाव येथे उपचारासाठी आलेल्या कुटुंबीयांवर घरी परतताना दांडगे पेट्रोल पंपाजवळ दारूच्या अती नशेत दुचाकी चालवणाऱ्या राजकुमार इंगळे (वय ३०) याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, निलेश खाळपे (वय २९), भागवत खाळपे (वय ५२) आणि सक्षम खाळपे (वय १२) हे जळगाव येथे उपचारासाठी आले होते. उपचारानंतर ते दुचाकीने धानोरा महासिद्धकडे परत जात असताना दांडगे पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.दरम्यान, समोरून येणाऱ्या राजकुमार इंगळे याच्या दुचाकीची खाळपे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवरील चारही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यापैकी तिघांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, राजकुमार इंगळे हा दारूच्या अती नशेत वाहन चालवत असल्याचे सांगण्यात येत असून,त्याच्याकडे सुमारे अर्धा लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविण्याच्या गंभीर प्रकारामुळेच हा अपघात घडला का, याबाबत पोलिस तपासाची गरज निर्माण झाली आहे.घटनेनंतर जळगाव जामोद पोलिसांकडून पुढील कारवाई काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वृत्त लिहेपर्यंत जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली.

Previous Post Next Post