तुळजाभवानी संस्थान परिसरात हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न...


 तुळजाभवानी संस्थान परिसरात हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद तालुक्यातील जागृत व पुरातन तुळजाभवानी संस्थान मंदिर परिसरात नवनिर्मित हनुमान मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. चांगेफळ येथील स्वामी राम भारती महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा व धार्मिक विधी पार पाडण्यात आले.यापूर्वी या ठिकाणी हनुमंताचे छोटे मंदिर होते. मात्र भाविकांच्या श्रद्धेला व परिसराच्या धार्मिक महत्त्वाला लक्षात घेऊन तुळजाभवानी संस्थानच्या संचालक मंडळाने पुढाकार घेत लोकवर्गणीच्या माध्यमातून आकर्षक व भव्य हनुमान मंदिराची उभारणी केली. मंदिरासाठी आवश्यक असलेली जागा सखाराम वानखडे यांनी दानस्वरूपात दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल उपस्थित भाविकांनी कौतुक व्यक्त केले.कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर तुळजाभवानी संस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी संस्थानचे संचालक मंडळ व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post