आर सी २४ न्युज नेटवर्क...
अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाभावी कार्याने स्वतंत्र ठसा उमटविणारे, श्री संत गजानन महाराजांचे परमभक्त परमपूज्य श्री श्री १०८ महंत स्वामी सुरेश्वरानंदगिरी उर्फ दासगिरी महाराज (वय ६०) यांचे १९ सप्टेंबर रोजी वैकुंठ गमन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, भक्तगण आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या हजारो भाविकांनी जड अंतःकरनानी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच हजारो भक्तांचे उपस्थितीत नगरप्रदक्षिणा करून महाराजांनी आधीच सांगितलेलं ठिकाण त्यांना समाधी देण्यात आली.
महाराजांनी आपले संपूर्ण जीवन धर्मसेवा, अध्यात्म, गोसेवा आणि समाजसेवेला समर्पित केले. अकोट तालुक्यातील अंबोडा येथे त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर उभारून कृष्णाई गोशाळेची स्थापना केली आणि गोमातेची अखंड सेवा केली. गोरक्षणाच्या माध्यमातून अनेक गायींना आधार देत त्यांची मायेने देखभाल केली. विशेषतः वय झालेल्या व आधाराची गरज असलेल्या गायींचीही त्यांनी शेवटपर्यंत सेवाभावाने काळजी घेतली.धर्मकार्याबरोबरच महाराजांनी विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले. बालसंस्कार शिबिरे, व्यसनमुक्ती शिबिरे, रोगनिदान शिबिरे, रक्तदान शिबिरे या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संस्कार रुजविण्याचे कार्य केले.अध्यात्मिक क्षेत्रातही महाराजांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद् भागवत कथा, श्रीराम कथा, रामायण, श्री नवनाथ कथा, संत चरित्र कथा, शिवमहापुराण तसेच श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाच्या कथा-पारायणांचे आयोजन विविध ठिकाणी झाले. संगीत व दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्यानेही त्यांनी अध्यात्माचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या वाणीतून हजारो भाविकांनी अध्यात्मिक विचारांचे श्रवण केले.महाराजांनी आपल्या हयातीत श्री दास सच्चिदानंद गिरी सेवा समिती ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षपदी गजानन भगीरथ गिरी तर सचिव म्हणून चंदू मधुकर बहादुरे तर कोषाध्यक्ष अमोल श्रीराम सौदागर यांची नियुक्ती करण्यात केली तसेच उत्तराधिकारी म्हणून श्री श्री १००८ महंत स्वामी ब्रह्मस्वरूपानंदजी गिरी महाराज हे सांभाळतील व त्यांच्या सेवाकार्याची परंपरा पुढेही सुरू राहावी, हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
महाराजांच्या वैकुंठ गमनाची बातमी समजताच त्यांच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील भक्त, भाविक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली. ३० हजारांहून अधिक भाविकांनी महाराजांचे अंतिम दर्शन घेतले .भक्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात त्यांच्या आठवणी अशा भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.महाराजांनी आधीच लिहून ठेवल्याप्रमाणे पुढील सोळा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा व सोळाही दिवस भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराज हे केवळ धर्मप्रचारक नव्हते, तर समर्पित गोरक्षक, गोसेवक आणि समाजसेवक होते. ‘गोसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे अनेकांना आधार, संस्कार आणि अध्यात्मिक दिशा मिळाली.त्यांचे संपूर्ण जीवन धर्म, अध्यात्म, गोसेवा आणि समाजसेवेचा आदर्श ठरले. त्यांच्या जाण्याने समाजात निर्माण झालेली पोकळी निश्चितच मोठी आहे. मात्र त्यांनी उभे केलेले सेवाकार्य, दिलेले संस्कार आणि समाजहिताचा विचार भाविक व अनुयायांना सदैव प्रेरणा देत राहील.
