जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
तालुक्यातील पळशी सुपो येथे विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचा विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता बादल अंभोरे हे घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या तयारीत होते. घरातून वायर विहिरीजवळ नेऊन तेथील इलेक्ट्रिक बोर्डाच्या प्लगमध्ये वायर टाकत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने ते बोर्डापासून फेकले गेले.घटना लक्षात येताच त्यांच्या आईसह गावातील नागरिकांनी तातडीने त्यांना ऑटोरिक्षातून ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.या घटनेप्रकरणी सुरेंद्र सिद्धार्थ अंभोरे (वय २४, रा. पळशी सुपो) यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिस ठाण्यात मर्ग क्र. ५९/२०२६, कलम १९४ BNSS अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृत्यूचे प्राथमिक कारण इलेक्ट्रिक शॉक लागणे असे नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. तय्यब अली यांच्याकडे सोपविण्यात आला असून प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांनी केला. दाखल अधिकारी म्हणून पोहेकॉ. दीपक निकम यांनी कार्यवाही केली.बादल अंभोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने अंभोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
