ठाकरे गटाचा सरकारला इशारा; कापसाला १० हजार, सोयाबीनला ८ हजारांचा भाव देण्याची मागणी...
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);
महाराष्ट्र शासनाने राज्यातील १८ जिल्हे कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असताना बुलढाणा जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे.बुलढाणा जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.दि. १५ सप्टेंबर रोजी खामगाव येथे झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन बापू देशमुख, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आणि शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.गेल्या सुमारे ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यामुळे शासनाने बुलढाणा जिल्ह्याला कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.दुष्काळाच्या मदतीसोबतच शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठीही मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे मागण्या मांडण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये, तर सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव देण्यात यावा,अशी मागणी बैठकीत करण्यात आली.तसेच सरसकट कर्जमाफी करावी, प्रीपेड वीज मीटर बसवू नयेत, पीकविमा तत्काळ अदा करावा,बंद झालेले ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे पुन्हा सुरू करावेत, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा करावा आणि कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या.शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास ३० सप्टेंबर रोजी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले.बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात, प्रा. नरेंद्र खेडेकर आणि जयश्रीताई शेळके यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केले, तर आभार रवींद्र झाडोकर यांनी मानले.यावेळी वसंतराव भोजने, तुकाराम काळपांडे, गजानन ठोसर, बाबा काळे, हर्षल आकरे,शुभम पाटील, श्रीराम खेलदार, ईश्वर पांडव, रमेश ताडे, योगेश पल्हाडे, हरिदास राजे, चाँद कुरेशी,अर्जुन तांगडे, निलेश उन्हाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
