आणखी एका शेतकरी कुटुंबातील लेकीची उत्तुंग भरारी!भेंडवळच्या कु. पुनम साबेची ‘कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक’पदी निवड;आमदार डॉ. संजय कुटे व डॉ अपर्णाताई कुटे यांनी केला सत्कार...


 आणखी एका शेतकरी कुटुंबातील लेकीची उत्तुंग भरारी!भेंडवळच्या कु. पुनम साबेची ‘कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक’पदी निवड;आमदार डॉ. संजय कुटे व डॉ अपर्णाताई कुटे यांनी केला सत्कार...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलींनाही शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे भेंडवळ येथील कु. पुनम बाळकृष्ण साबे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून नागपूर विभागात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक पदावर तिची नुकतीच निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भेंडवळ, ता. जळगाव जामोद येथील शेतकरी श्री. बाळकृष्ण साबे यांची कन्या असलेल्या पुनम हिने प्रतिकूल परिस्थिती, कष्ट आणि संघर्षावर मात करीत शिक्षणाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. शेतकरी कुटुंबातील परिस्थितीशी दोन हात करत तिने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना गवसणी घातली आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे व डॉ. अपर्णाताई कुटे यांनी जळगाव जामोद येथील निवासस्थानी कु. पुनम साबे हिचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले, “मुलगी शिकली की केवळ एका व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे आणि पुढील पिढीचे भविष्य घडते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ दिले पाहिजे.”कु. पुनम साबे हिच्या या यशातून ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील अनेक मुलींना नवी प्रेरणा मिळणार असून, जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे.भेंडवळच्या या लेकीच्या उत्तुंग भरारीने केवळ साबे कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे.

Previous Post Next Post