मुंबईतील होमगार्ड प्रशिक्षणात ज्ञानेश्वरी जाधव हिचे यश; तृतीय क्रमांकाने सन्मान.अनायुक्त अधिकारी प्रशिक्षणात जळगाव जामोद पथकाचा गौरव; सीमा मानकर हिलाही सन्मानपत्र...


 मुंबईतील होमगार्ड प्रशिक्षणात ज्ञानेश्वरी जाधव हिचे यश; तृतीय क्रमांकाने सन्मान.अनायुक्त अधिकारी प्रशिक्षणात जळगाव जामोद पथकाचा गौरव; सीमा मानकर हिलाही सन्मानपत्र...

बुलडाणा जिल्हा(प्रतिनिधी); 

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद होमगार्ड पथकातील महिला गृहरक्षकांनी मुंबई येथे झालेल्या अनायुक्त अधिकारी प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी केली. मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, होमगार्ड, घाटकोपर, मुंबई येथे दि. ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित पाठ्यक्रम क्रमांक ११०५ मध्ये जळगाव जामोद पथकातील दोन महिला गृहरक्षक सहभागी झाल्या होत्या.या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिला गृहरक्षकांना शारीरिक कवायत (पी.टी.), मार्चिंग, लाठी कवायत, रायफल्स परेड तसेच तोंडी व लेखी परीक्षा अशा विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान शिस्त, शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन करण्यात आले.प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी वरिष्ठ निर्देशक सचिन गावंडे, केंद्र प्रमुख निर्देशक अधिकारी राजीव सांबारे, नाशिक केंद्राचे मंगल पाटील, ठाणे केंद्राचे अरुण खरात, छत्रपती संभाजीनगरचे प्लाटून कमांडर संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी महिला गृहरक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या प्रशिक्षणात जळगाव जामोद पथकातील महिला गृहरक्षक ज्ञानेश्वरी सुदामा जाधव (सनद क्र. ७१३) हिने तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तिचा मंचावर सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ज्ञानेश्वरी जाधव हिने यापूर्वीही मुंबई येथे सन २०१० मध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण, तसेच सन २०१४ मध्ये मानसेवी निर्देशक प्रशिक्षण पूर्ण केले आहे.याच पथकातील महिला गृहरक्षक सीमा राजेंद्र मानकर (सनद क्र. ७११) हिलाही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.दोन्ही महिला गृहरक्षकांनी जळगाव जामोद पथकाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल तालुका समादेशक अधिकारी, वरिष्ठ पर्यटन नायक, सर्व प्लाटून नायक तसेच महिला व पुरुष गृहरक्षक सैनिकांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Previous Post Next Post