गणेशभक्तीला सामाजिक सेवेची जोड! मोरया गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान...


 गणेशभक्तीला सामाजिक सेवेची जोड! मोरया गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या सामाजिक संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मोरया गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.अपघात, विविध आजार तसेच प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. रक्तक्षय, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल यांसारख्या आजारांमध्ये रुग्णांना वारंवार रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे, असा संदेश मोरया मंडळाच्या वतीने देण्यात आला.१८ ते ६० वर्षे वयोगटातील निरोगी व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले.एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानातून विविध रक्तघटक वेगळे करून गरजेनुसार वेगवेगळ्या रुग्णांना त्याचा उपयोग होऊ शकतो. रक्तदानापूर्वी रक्तदात्याचे समुपदेशन व वैद्यकीय तपासणी केली जाते,तसेच रक्ताची आवश्यक तपासणी करूनच ते रुग्णांसाठी वापरले जाते.गणेशोत्सवाच्या उत्साहात १५१ गणेशभक्तांनी रक्तदान करून ‘भक्तीसोबत समाजसेवा’चा आदर्श निर्माण केला. मोरया गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post