जळगाव जामोद(प्रतिनिधी);
शेतकरी बांधवांच्या जीवनातील महत्त्वाचा बैलपोळा सण जळगाव जामोद शहरात उत्साहात पार पडला. दुर्गा चौक, वायली वेस, खेडी वेस व सुनगाव वेस परिसरातून सजविलेल्या बैलजोड्यांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. रंगीबेरंगी झुली, शिंगांना रंगरंगोटी, फुलांच्या माळा व गळ्यातील घंटांनी सजलेल्या बैलजोड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांमुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी मोठी गर्दी करून मिरवणुकीचा आनंद घेतला. शेतकरी कुटुंबांनी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे, पीएसआय अमोल पंडित, हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर, निलेश पुंडे,ट्रॅफिक विभागाचे हेड कॉन्स्टेबल शांतीलाल धीरबस्सी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत, मंगेश सोळंके,सुपाजी तायडे, सतीश पाटोळे ,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे बैलपोळा सण शांततेत आणि उत्साहात पार पडला.

