अवैध दारू मुळे त्रस्त आदिवासी बांधवांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा.पोलिसांना हप्ता देत असल्याचा धक्कादायक आरोप...


अवैध दारू मुळे त्रस्त आदिवासी बांधवांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा.पोलिसांना हप्ता देत असल्याचा धक्कादायक आरोप...

प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

अकोला जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून अवैध धंद्यावर पोलीस यंत्रनेचा कोणताच वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.  शेवटी अवैध दारू विक्रीला कंटाळून तेल्हारा तालुक्यातील आदिवासी ग्राम पिंपरखेड येथील महिलांनी हिवरखेड पोलीस स्टेशनवर मोर्चा आणून पोलिसांना जाब विचारला आहे.हिवरखेड पोलिसांच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून मागील दोन-तीन वर्षात तब्बल २० ते २५ तरुणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप निवेदनातून करण्यात आला असून याबाबत गावातील चावडी अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामस्थांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावात साबुलाल बाबूलाल कासोटे, ब्रिजलाल मावस्कर, पांडुरंग धांडे हे व्यक्ती अवैधरित्या दारूची विक्री करीत आहेत. या अवैध धंद्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडले असून अनेक कुटुंब आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकटात सापडली आहेत.तक्रारीत पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी ग्रामस्थांनी गाव चावडीमध्ये अवैध विक्रेत्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी ती धुडकावून लावली. इतकेच नव्हे तर दि. ११/०९/२०२५ शुक्रवार रोजी गाव चावडीमध्ये येऊन चावडी अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष व उपस्थित ग्रामस्थांना उद्धटपणे धमकावले. आणि मी "पोलीस स्टेशनला पंधरा हजार रुपये हप्ते देतो, त्यामुळे माझ्याविरुद्ध चावडी कडून काहीही होणार नाही; तुम्ही काहीही करू शकत नाही; तुम्हाला जे करायचे ते करा," असे आव्हानात्मक वक्तव्य केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच हिरालाल बाबूलाल कासोटे व अमर गोपाल जांभळे यांनी चावडी प्रमुख व ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही अर्जात नमूद आहे.विशेष म्हणजे वीर क्रांतिकारक रेगा कोरकू यांच्या पुतळ्याच्या परिसरात हा अवैध देशी दारू विक्रीचा प्रकार सुरू असून सामाजिक भावना दुखावली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

--ग्रामस्थांच्या ६ प्रमुख मागण्या--

१. अवैध दारू विक्रीची चौकशी करून ती तात्काळ बंद करावी.२. चावडी अध्यक्ष व ग्रामस्थांना धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करावा.३. गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.४. "पोलीस स्टेशनला १५ हजार हप्ता देतो" या वक्तव्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्यता पडताळावी.५. तरुणांच्या जीवनावर होत असलेल्या गंभीर परिणामांची दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात.६. भविष्यात कोणत्याही ग्रामस्थास धमकी, दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी.या निवेदनावर नंदकिशोर नंदू गवते (तंटामुक्ती अध्यक्ष), राजपाल रामलाल गवते,हिरालाल छगन जोवळे,निलेश दयाराम कासोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार तेल्हारा, उपविभागीय अधिकारी अकोट आणि पोलीस अधीक्षक अकोला यांना देखील देण्यात आल्या आहेत.दरम्यान, पोलीस यंत्रणेबाबत आर्थिक देवाणघेवाणीचा गंभीर दावा करण्यात आल्याने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असून पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post