चिलाटीच्या आदिवासी विद्यार्थ्याची परदेशात शैक्षणिक भरारी.!हतरू ग्रामपंचायतीच्या अतिदुर्गम चिलाटीतून थेट ब्रिस्टलपर्यंत किशोर बेठेकर यांची भरारी!


 चिलाटीच्या आदिवासी विद्यार्थ्याची परदेशात शैक्षणिक भरारी.!हतरू ग्रामपंचायतीच्या अतिदुर्गम चिलाटीतून थेट ब्रिस्टलपर्यंत किशोर बेठेकर यांची भरारी!

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील हतरू ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम चिलाटी गावातील आदिवासी विद्यार्थी किशोर बेठेकर यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चिलाटीसारख्या दुर्गम गावातून शिक्षण घेत थेट इंग्लंडमधील प्रतिष्ठित University of Bristol, UK येथे उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. चिलाटी गावातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारे पहिले  विद्यार्थी म्हणून त्यांची ही कामगिरी संपूर्ण हतरू ग्रामपंचायत आणि मेळघाटसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.किशोर बेठेकर यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अनुदानित आदिवासी आश्रम शाळा रेवसा येथून झाली. त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण येथे पूर्ण केले. त्यानंतर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, हतरु येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे शासकीय आश्रम शाळा, जारीदा येथे विज्ञान शाखेतून इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले.उच्च शिक्षणासाठी त्यांनी सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथून BSW (Bachelor of Social Work) पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई येथील नामांकित Tata Institute of Social Sciences (TISS) मधून M.A. Education पदवी प्राप्त केली.शिक्षणातील हीच वाटचाल पुढे नेत किशोर आता इंग्लंडमधील University of Bristol येथे एका वर्षाच्या MSc in Education अभ्यासक्रमासाठी जात आहेत. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासात Eklavya India Foundation आणि राजू केंद्रे यांचे उच्च शिक्षणासाठी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.

अतिदुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेकदा शिक्षणाच्या मर्यादित सुविधा आणि विविध अडचणी असतात. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत चिलाटी गावातून सुरू झालेला किशोर बेठेकर यांचा प्रवास आता थेट इंग्लंडपर्यंत पोहोचला आहे.त्यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर चिलाटी, हतरू ग्रामपंचायत, मेळघाट आणि संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षण, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जगाच्या पटलावर पोहोचता येते, हे किशोर बेठेकर यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.चिलाटीच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आता University of Bristol, UK पर्यंत पोहोचला असून, किशोर बेठेकर यांची ही भरारी मेळघाटच्या नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post Next Post