शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३० सप्टेंबरला खामगावात एल्गार!हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी व्हा; आमदार सिद्धार्थ खरात यांचे आवाहन..


 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३० सप्टेंबरला खामगावात एल्गार!हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी व्हा; आमदार सिद्धार्थ खरात यांचे आवाहन...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी खामगाव येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली.आमदार सिद्धार्थ खरात, लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर,जिल्हाप्रमुख गजानन वाघ आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मोर्चाच्या नियोजनासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके संकटात सापडली आहेत.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असताना बुलढाणा जिल्ह्याचाही दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली.यासोबतच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा, सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, पीक विम्याची तत्काळ रक्कम अदा करणे, तसेच जळगाव जामोद तालुक्यात दीड महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी होणाऱ्या या मोर्चात प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केले.जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेत पदाधिकारी,शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.बैठकीस उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,विधानसभा संघटक भीमराव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, अल्पसंख्याक सेना जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान, उपतालुकाप्रमुख पुंडलिक पाटील, संग्रामपूर उपतालुकाप्रमुख विजय मारोडे, जनार्दन कराळे,शहरप्रमुख रमेश ताडे, माजी शहरप्रमुख कैलास राजपूत, युवासेनेचे संकेत रहाटे, जिल्हा उपप्रमुख विशाल पाटील, जिल्हा उपप्रमुख पंकज मिसाळ, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत इंगळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post