सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);
कमी पाऊस आणि पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास मंच महाराष्ट्र, शाखा पिंपळगाव राजा यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.राज्यातील अनेक भागांत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असून, पावसाने दीर्घ खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके सुकत असून, उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे.या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रत्येक गावात तसेच बाधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानीचे मूल्यांकन करावे, अशी मागणी शेतकरी विकास मंचने केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा.पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी.बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.शेतकऱ्यांना पीकविम्याची संपूर्ण पात्र रक्कम अदा करावी.शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.संकटग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व पात्र सवलती व मदत तातडीने द्यावी.जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.पुढील हंगामासाठी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांसाठी विशेष आर्थिक मदत द्यावी.शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी विकास मंचच्या वतीने करण्यात आली.निवेदन देतेवेळी निखिल महाले, नानाभाऊ इंगळे, मोहम्मद फारुख, सलीम खान, विजय पांडुरंग शेजोळ, मोहम्मद लुकमान, रमेश शंकर करांगळे, विजय वासुदेव ढगे, वसंतराव सातव, सय्यद वकील, मोहम्मद अकबर, मोहम्मद नासिर, गजानन वासुदेव वहिले, मोहम्मद जुबेर, मोहम्मद अजीम, मुदसिर खान, शिवराम साटोटे आदी उपस्थित होते.
