जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
शासनाच्या विविध योजना, अनुदान तसेच पीकविमा यांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पिक पाहणी महत्त्वाची असताना, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना विविध तांत्रिक व व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच प्रवीण महादेव भोपळे यांनी जळगाव जामोद तहसीलदारांकडे निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विविध योजना, अनुदान व पीकविमा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी ई-पिक पाहणीसाठी शिवारात जात आहेत. मात्र, ई-पिक पाहणी अॅपमधील तांत्रिक अडचणी तसेच काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नसल्यामुळे अनेकांना ई-पिक पाहणी करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. काही शेतकऱ्यांना अॅपमध्ये पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी अद्याप झालेली नाही, अशा शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या गट क्रमांकानुसार तलाठी किंवा कोतवाल यांच्यामार्फत करून घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.जळगाव जामोद तालुका अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या निकषांमध्ये समाविष्ट असून, सध्या अतिवृष्टी मदतीच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या यादीमध्ये सामूहिक सातबारा असलेल्या खातेदारांकडून संमतीपत्राची अट ठेवण्यात आली आहे.मात्र, अनेक शेतकऱ्यांची सामूहिक शेती असून त्यातील काही सहहिस्सेदार रोजगारानिमित्त पुणे, मुंबई किंवा इतर शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. प्रत्येक वेळी संमतीपत्रासाठी त्यांना बोलावणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या व व्यावहारिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे सामूहिक शेतीच्या मालकाचे संमतीपत्र किमान पाच वर्षांसाठी ग्राह्य धरावे, तसेच संबंधित सहहिस्सेदारांचा आक्षेप प्राप्त होईपर्यंत त्या संमतीपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी प्रवीण महादेव भोपळे यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या हिताच्या या दोन्ही मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य त्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्याव्यात, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
