जळगाव जामोद(प्रतिनिधी):
तालुक्यातील तरोडा येथील जागृत व प्राचीन तुळजाभवानी देवी संस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तुळजाभवानी मातेप्रती परिसरातील भाविकांची विशेष श्रद्धा आहे.अतिप्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. संस्थानाच्या विश्वस्त व संचालक मंडळाने लोकवर्गणीतून तुळजाभवानी मंदिरासह हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे.दरम्यान, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जळगाव जामोद ते तरोडा संस्थान रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने भाविकांचा प्रवास अधिक सुकर झाला आहे.नवरात्रोत्सवाची सांगता सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे होमहवनानंतर महाप्रसादाने होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुळजाभवानी संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.नवरात्रोत्सवामुळे तरोड्यात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
