शिक्षणातूनच विकासाचा मार्ग; संकटांना धैर्याने सामोरे जा!बी.एस. पटेल महाविद्यालयात गुणश्री प्रा. डॉ. सादिक पटेल यांचे प्रेरणादायी व्याख्यान...


 शिक्षणातूनच विकासाचा मार्ग; संकटांना धैर्याने सामोरे जा!बी.एस. पटेल महाविद्यालयात गुणश्री प्रा. डॉ. सादिक पटेल यांचे प्रेरणादायी व्याख्यान...

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी.एस. पटेल सर उपाख्य भाऊसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत जे.जे. हॉस्पिटल, मुंबईचे उपअधिष्ठाता गुणश्री प्रा. डॉ. सादिक पटेल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, ध्येय निश्चिती आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी बी.एस. पटेल उपाख्य भाऊसाहेब, मातोश्री हज्जन जैतून बी बापूमिया पटेल व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयातील विविध उपक्रम तसेच जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सादिक पटेल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन स्वतःचा तसेच आपल्या परिवाराचा विकास साधावा. विकासाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण. पूर्वीच्या काळात शिक्षणासाठी अनेक अडचणी होत्या; मात्र आज विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सुविधांचा उपयोग करून ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळासारख्या संकटांच्या काळात विविध अडचणी निर्माण होतात. मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता धैर्याने संकटांचा सामना करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी पिंपळगाव परिसरातील जुन्या व प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्याला उजाळा देत, आपल्या वडिलांचे या परिसरातील विद्यार्थ्यांना घरची भाकर खाऊन विज्ञानाचे शिक्षण घेता यावे हे स्वप्न असल्याचे सांगितले. हे स्वप्न सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजय अंभोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बी.एस. पटेल सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा दिला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, पद्मने साहेब, हरि पाटील आडोळ, मुरलीधर पाटील गौलखेड, दिवाणसिंग राजपूत, उपसरपंच निलेश भोपळे, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सदस्य दरबारसिंग जाधव, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी राज्यस्तरीय खेळाडू गायत्री दवंगे हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य एम. बी. इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एम. डी. नेतनास्कर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post