बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);
वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या भावनेशी जोडत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त सहकुटुंब सेवा संकल्प प्रतिष्ठान, पळसखेड सपकाळ येथे उपस्थित राहून संस्थेतील विशेष काळजी व उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तींसोबत आपला जन्मदिवस साध्या, स्नेहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला.सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, मानवी मूल्ये आणि समाजातील गरजू व्यक्तींप्रती असलेली आत्मीयता यांचा प्रत्यय आला. जन्मदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा क्षण संस्थेतील रहिवाशांसोबत सामायिक करून त्यांच्या सहवासात वेळ व्यतीत करण्याला या उपक्रमात विशेष महत्त्व देण्यात आले.पदापेक्षा माणुसकीला आणि औपचारिकतेपेक्षा आपुलकीला प्राधान्य देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. समाजातील वंचित, गरजू तसेच विशेष काळजीची आवश्यकता असलेल्या व्यक्तींनाही सन्मान, प्रेम आणि आपलेपणाची जाणीव मिळणे आवश्यक आहे, हा मानवी दृष्टिकोन या उपक्रमातून अधोरेखित झाला.वाढदिवसाचा उत्सव केवळ वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न ठेवता समाजातील इतर व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण वाटून घेणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हाच या उपक्रमाचा मोलाचा संदेश ठरला.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सहकुटुंब केलेल्या या साध्या, स्नेहपूर्ण उपक्रमातून माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित झाले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची जाणीव करून देणारे असे उपक्रम सामाजिक सलोखा आणि मानवी नात्यांतील जिव्हाळा अधिक दृढ करण्यास निश्चितच प्रेरणा देतात.
