जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
तालुक्यातील वडगाव गड येथे मुक्या जनावरावर झालेल्या अमानुष हल्ल्याने परिसर हादरला असून, गाईच्या पोटात भाला खुपसून तिला गंभीर जखमी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर जखमी गोमातेचा अखेर मृत्यू झाला आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून, आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास वडगाव गड येथील अहमद शहा यांच्या वाड्याजवळ एका गाईच्या पोटात भाला खुपसलेला असल्याची माहिती मिळाली. ग्रामसभेत उपस्थित असलेले फिर्यादी अनंता सरदार यांना ही माहिती मिळताच त्यांनी मिलन माळवणकर व गोविंद काटोळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाईच्या पोटात भाला खुपसलेला असल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती तत्काळ जळगाव जामोद पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी अनंता सरदार यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६३१/२०२६, कलम ३२५ BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या गाईचा अखेर मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुक्या प्राण्यावर अशा प्रकारे क्रूरपणे हल्ला करणाऱ्या आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन २४ तासांच्या आत त्याला जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, फिर्यादी अनंता सरदार यांच्यासह ग्रामस्थांनी या प्रकरणात गाईचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण/गोहत्या बंदीच्या लागू तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. अज्ञात आरोपी अद्याप फरार असून त्याचा तातडीने शोध घेऊन कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.या घटनेमुळे वडगाव गड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपासातून या अमानुष कृत्यामागील आरोपी कोण आहे, याचा लवकरात लवकर उलगडा होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
