जळगाव जामोद(प्रतिनिधी);
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या ३३ व्या मुले व २६ व्या मुलींच्या सब-ज्युनियर राष्ट्रीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या दुहेरी सुवर्णविजयामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या सुवर्णविजयी मोहिमेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे कर्णधारपद विश्वजित अभयसिंह मारोडे याने भूषविले. कर्णधार म्हणून त्याने दाखविलेले नेतृत्व, आत्मविश्वास आणि संघभावनेमुळे संघाच्या यशात मोलाची भर पडली.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या चार खेळाडूंनी महाराष्ट्राच्या विजयी संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये सोहम सुधाकर ढोकणे, विरेन विनोद मोहे, विश्वजित अभयसिंह मारोडे आणि सोहम दीपक इंगळे यांचा समावेश आहे.या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्राचा तिरंगा अभिमानाने उंचावला. त्यांचा हा पराक्रम संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.हा विजय केवळ सुवर्णपदकाचा नसून कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त, संघभावना आणि जिद्दीचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे युवा खेळाडूंना आट्यापाट्या खेळाकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात या यशाची विशेष नोंद झाली आहे.
