श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात बी.कॉम. 2012-15 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात...


 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात बी.कॉम. 2012-15 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे बी.कॉम. सन 2012 ते 2015 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, दि. 14 नोव्हेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने महाविद्यालयाच्या परिसरात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि स्नेह, आपुलकी व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी, महाविद्यालयाचे अधीक्षक संजय गाडेकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ऋषिकेश विप्रदास,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. डाबरे, ग्रंथपाल संतोष कतोरे तसेच अन्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम जपावेत, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा आणि महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच विद्यार्थी जीवनातील संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाने दिलेली मूल्ये ही पुढील आयुष्यातील यशाची भक्कम पायाभरणी असल्याचे सांगण्यात आले.प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हा केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम नसून, महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव व कौशल्यांचा उपयोग महाविद्यालयातील विद्यमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.मिलिंद जोशी यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी असलेले नाते कायम ठेवून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, मित्र-मैत्रिणींसोबतचे अनुभव तसेच आपल्या आजवरच्या वाटचालीतील विविध प्रसंग मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आकाश निलजे यांनी केले, तर सागर म्हसाळ यांनी आभार मानले. या स्नेहमेळाव्याचे संपूर्ण आयोजन बी.कॉम. 2012 ते 2015 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केले.जुन्या आठवणी, मित्र-मैत्रिणींची भेट आणि महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध यामुळे हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

Previous Post Next Post