सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा(प्रतिनिधी)
जोडीदाराच्या शोधात असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी लोणारमध्ये १ डिसेंबरला वधू-वर परिचय मेळावा रंगणार आहे. मेळाव्यातून विवाह जुळल्यास वधू-वरांपैकी एकाला नोकरी मिळवून देण्यासाठी बुलढाणा अर्बनतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा आणि बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत लोणारच्या श्रीमंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
अंध, मूकबधिर आणि अस्थिव्यंग असलेल्या विवाहेच्छुकांना मेळाव्यात सहभागी होता येईल. दिव्यांग व्यक्तीशी विवाह करण्यास इच्छुक असलेल्या इतर व्यक्तींनाही, तसेच विधवा आणि घटस्फोटित व्यक्तींनाही नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा होणार असून, प्रवीण कुमार देवरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, समाजकल्याण विभागाचे मनोज मेरत आणि मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एस. लहाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण आत्माराम म्हस्के, सचिव डॉ. वसंतराव चिंचोले, कोषाध्यक्ष दिलीप नागरिक आणि सदस्य यांचीही उपस्थिती राहणार आहे.
नोंदणी कुठे कराल?
परिचयपत्र आणि माहितीपत्र बुलढाण्यातील जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील बुलढाणा अर्बनच्या शाखा, सहकार विद्या मंदिराच्या शाखा आणि शिवसाई पतसंस्थेच्या शाखांमध्येही हे अर्ज मिळतील. भरलेले अर्ज nabbuldana91@gmail.com या ई-मेलवर पाठवता येतील.मेळाव्याच्या दिवशीही नावनोंदणी करता येईल. इच्छुकांनी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत. यापैकी जी कागदपत्रे उपलब्ध असतील, ती घेऊन मेळाव्याला यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
